राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन
करोनाने दुसऱ्यांदा गाठले होते
Published:Nov 28, 2020 08:21 AM | Updated:Nov 28, 2020 08:21 AM
News By : Muktagiri Web Team
करोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा करोनाने गाठल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती. भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र, त्यात यश आले नाही आणि शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भालके यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनसमयी त्यांचे वय ६० वर्षे इतके होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. भालके यांच्या पार्थिवावर पंढरपुरातील सरकोली येथे शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.