काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुडाळ : काटवली (ता. जावली) दापवडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्राला इमारतीसाठी निधी उपलब्ध व्हावा व या उपकेंद्रात आरोग्य अधिकार्याची नेमणूक करावी,अशी मागणी काटवली व दापवडी ग्रामस्थांनी आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुडाळ येथील आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आले असता ग्रामस्थांनी हे निवेदन दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, पंचायत समिती जावलीचे उपसभापती सौरभ शिंदे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान मोहिते, कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनंत वेलकर आदी उपस्थित होते.
नुकतेच स्थलांतरित करण्यात आलेल्या या काटवली आरोग्य उपकेंद्र अंतर्गत गणेश पेठ, रुईघर, शिंदेवाडी, काटवली, बेलोशी, दापवडी, रांजणी, राघववाडी, वहागाव, घोटेघर ही गावे येतात. प्रामुख्याने हा विभाग डोंगराळ व दुर्गम असून, याठिकाणी दळणवळणाच्या सोयी तोकड्या आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागते. त्यामुळे दापवडी येथे असणारे आरोग्य उपकेंद्र जागेअभावी बरेच दिवस कोमात होते. परंतु, काटवली येथील ग्रामस्थांनी या उपकेंद्राला जागा देण्याचे मान्य केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण झाले व ते केंद्र काटवली येथे नुकतेच स्थलांतरित करण्यात आले आहे.
या उपकेंद्राला आरोग्य विभागाच्या नियमानुसार सध्या दोन खोल्या देण्यात आल्या असून, जागाही देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत व्हावी, यासाठी आरोग्य विभागाने तत्काळ निधी उपलब्ध करून येथे इमारत बांधावी. व या ठिकाणी आपण आरोग्य अधिकारी उपलब्ध करून देऊन या विभागाला आरोग्याच्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.
यावेळी डॉ. आठल्ये यांनी याबाबत लवकर विचार करून निधी उपलब्धतेसाठी पावले उचलू, असे सांगितले.
यावेळी काटवलीचे सरपंच हनुमंत बेलोशे, नवनिर्वाचित सदस्य सदाशिव बेलोशे, बबनराव शिंदे, साहेबराव गोळे, राजेंद्र बेलोशे आदी उपस्थित होते.