महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून संपूर्ण भारतभर अटकेपार झेंडे लावले असे शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव हे फलटण तालुक्यातील मुरूम आहे. हा इतिहास गेली कित्येक वर्ष कोणालाच माहीत नव्हता. मात्र, मध्यंतरी गेल्या सात-आठ वर्षांपासून हे गाव महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला येऊ लागले. या मुरुम गावच्या विकासासाठी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
फलटण : महाराजा मल्हारराव होळकर यांनी मावळा प्रांत जिंकून संपूर्ण भारतभर अटकेपार झेंडे लावले असे शूरवीर सरदार महाराजा मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव हे फलटण तालुक्यातील मुरूम आहे. हा इतिहास गेली कित्येक वर्ष कोणालाच माहीत नव्हता. मात्र, मध्यंतरी गेल्या सात-आठ वर्षांपासून हे गाव महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला येऊ लागले. या मुरुम गावच्या विकासासाठी ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांतून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
यामुळे विशेष करून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना महाराजा मल्हारराव होळकर यांची जयंती ही सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली होती. अलीकडे ‘मुरूम’ हे गाव श्रीमंत मल्हाराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखले जाऊ लागले होते. त्यामुळे या गावी अनेक लोकांची ये-जा देखील वाढली आहे.
मागील दोन महिन्यांपूर्वी फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे वंशज महाराजा यशवंतराव होळकर यांनी देखील मुरूम गावी भेट दिली होती. या भेटीमध्ये संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, सत्यजितराजे नाईक-निंबाळकर हे देखील सहभागी झाले होते.
यावेळी मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून या गावामध्ये अनेक विकास कामे होणे अपेक्षित असल्याचे मत महाराजा यशवंतराव होळकर यांनी व्यक्त केले होते. यावेळी संजीवराजे नाईक-निंबाळकर आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणाले होते की, लवकरच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून या गावाच्या विकास कामासाठी भरघोस निधीची तरतूद केली जाईल, असे सांगितले होते.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करून महाराजा मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावी म्हणजे मुरूम या गावच्या विकास कामासाठी तब्बल 1 कोटी 61 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुरूम येथे भक्त निवास बांधण्याकामी 50 लाख 34 हजार, सभामंडप बांधण्याकामी 28 लाख 29 हजार, सार्वजनिक शौचालयासाठी 8 लाख 38 हजार तसेच गावांमध्ये बंदिस्त गटर बांधण्याकामी 10 लाख 30 हजार, नदीकाठी घाट बांधण्यासाठी 30 लाख 30 हजार गावांतर्गत सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी 29 लाख 28 हजार व गावातील स्ट्रीट लाईटसाठी चार 4 लाख 32 हजार असा एकूण 1 कोटी 61 लाख 31 हजार असा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
या निधीतून काही विकास कामाचा शुभारंभ म्हणजे मुरुम गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज महानंद दूधसंघाचे व्हा. चेअरमन डी. के. आण्णा पवार, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, गावच्या सरपंच प्रियंका बोंद्रे, उपसरपंच संतोष बोंद्रे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
भविष्यामध्ये मुरुम या गावाला महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव म्हणून खूप मोठा विकास निधी येणार असून, या गावाचे महत्त्व वाढणार असल्याची ही फलटण पंचायत समितीचे सभापती शंकराव माडकर व डी. के. आण्णा पवार यांनी सांगितले आहे.