राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शविली होती. तशी विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्यात केल्याची माहिती त्यांनी स्वतःहून दिली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस येणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. काही दिवसांनी महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यपाल अभिभाषण करत असतात. यावेळी विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती. नुकतेच दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे कोल्हापूरमधील नेते संजय पवार यांनी राज्यपालांविरोधात आक्रमक आंदोलन केले होते. मविआचे नेते सतत राज्यपाल हटाव मोहीम राबवत होते. त्यासाठी ते आग्रही होते. अखेर राज्यपालांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर विरोधकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.