अध्यात्माने जीवन आनंदी जगण्याचा मार्ग सुकर : माजी प्राचार्य शेवाळे
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 25 : अधात्म म्हणजे संपूर्ण ब्रम्हाडांचं ज्ञान...ज्ञान म्हणजे प्रकाश...या प्रकाशाने जीवन हे उजळून जाते. स्वयंप्रकाशित होते.. जीवन जगण्याच्या मार्गातील अंधार दूर होतो. अध्यात्माने जीवन आनंद जगण्याचा मार्ग सुकर होते, असे प्रतिपादन माजी प्राचार्य बाजीराव शेवाळे यांनी केले. मलकापूर-कराड येथील आधार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित मासिक बैठकी प्रसंगी अध्यात्म व सुखी जीवनाचा आनंदी मार्ग या विषयावर माजी प्राचार्य शेवाळे बोलत होते. यावेळी आधार जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब कदम गरुड, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष मारुती वळंजू, खजिनदार हिनुकले, मलकापूर नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती शंकरआप्पा चांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी प्राचार्य शेवाळे म्हणाले, अध्यात्मिक जीवन हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय असतं. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे. या ईश्वराप्रती कृतज्ञभाव प्रकट होणे आणि या ईश्वराला जीवन समर्पित करणे ही ईश्वर आणि मनुष्य जीवनातील आंतरक्रिया आहे. या प्रक्रियेत ईश्वर आणि मनुष्य यातील अंतर नाहीसे होते. मी ईश्वर रुप आहे हा आंतरिक भाव प्रकट होतो आणि मनातील सर्व विकार, विषय, वासना आपोआप नाहीशा होतात.ही अवस्था प्राकृतिक विश्वात विस्मय, महिमा आणि रहस्या प्रति एक अधात्मिक दृष्टीकोन आहे. हा दृष्टीकोन गुरफटलेल्या मानवी जीवनाला मुक्त करीत एक प्राकृतिक जीवनशैली विकसित करण्यास उपयुक्त ठरते. हीच मोक्ष प्राप्तीची संकल्पना आहे. हेच सत्य आहे,हेच शाश्वत जीवन आहे. कार्यक्रम प्रसंगी कोकणस्थ वैश्यवाणी समाज महासंघ मासिकाच्या सल्लागारपदी मारुती वळंजू यांची निवड झाल्याद्दल आधार जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्री. जामदार व शंकराप्पा चांदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब कदम गरुड यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष पाटील यांनी केले असून आभार जामदार यांनी मानले. कार्यक्रमास आधार जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.