पाटण तालुक्यातील करपेवाडी येथे सन 2019 साली बारावीतील विद्यार्थिनीचा गळा चिरून खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी जंग जंग पछाडले होते. अखेर चार वर्षानंतर भाग्यश्री संतोष माने या विद्यार्थिनीच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ढेबेवाडी पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत या खून प्रकरणातील संशयितांना गजाआड केले. तिच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून सोमवारी रात्रीपासून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही खून प्रकरण उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले.
दरम्यान यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे अधिकृत माहिती देणार असल्याचे समजते. हे खून प्रकरण नरबळीच्या संशयातून झाल्याची चर्चा परिसरात सुरू असून पोलिसांनी अत्यंत गोपनीयता बाळगत तपासाची एक एक कडी जोडत याचा उलगडा केला. चार वर्षानंतर उघडकीस आलेल्या खून प्रकरणानंतर सातारा जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे.