नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत.उद्या म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करतं. मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल.देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. देशात सात टप्प्यात लोकसभांचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग यंदा मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.