शिरवळ व मलकापूर येथे लवकरच नवीन शाखा बँकेची लवकरच शिरवळ व मलकापूर येथे नवी शाखा सुरु करण्यात येणार असून, यावर्षी बँकेचे संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तसेच लवकरच मोबाईल बँकींगची सेवाही सुरु करण्यात येणार आहे.
येथील कृष्णा सहकारी बँकेला ३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १७ कोटी ६० लाख रूपये इतका नफा प्राप्त झाला आहे. बँकेने या आर्थिक वर्षात ८७६ कोटी रूपयांचा व्यवसाय टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती, बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रबिंदू मानून लोकांना बचतीची सवय लागावी व गरजेनुसार कर्ज घेता यावे यासाठी सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी कृष्णा सहकारी बँकेची स्थापना केली. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृष्णा बँकेच्या ३१ मार्च २०२३ अखेरच्या एकूण ठेवी ५७६ कोटी ६६ लाख रूपयांच्या असून, २९९ कोटी ३८ लाख रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय ८७६ कोटींच्या वर झाला असून, नेट एन.पी.ए. शून्य टक्के राहिला आहे. बँकेकडे ८५ कोटींचा स्वनिधी असून, प्रती सेवक व्यवसाय ६ कोटी ५८ लाख इतका झालेला आहे. सर्व तरतुदी व कर वजा जाता बँकेने ९ कोटी निव्वळ नफा कमाविला आहे. बँकेने सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगली कामगिरी करत, व्यवसायवृद्धीचे उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे या ४ जिल्ह्यात १९ शाखांच्या माध्यमातून विनम्र व तत्पर सेवा देणाऱ्या या बँकेने सुरू केलेल्या एटीएम सेवेचा लाभही ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.