कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सोनवडी : कारी (ता. सातारा) येथील विलास जगन्नाथ भातुसे (वय 45) यांच्या घराला सुमारे 2.30 ते 3च्या दरम्यान अचानक आग लागल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. घरातील दस्तऐवजासह गहू, ज्वारी, हरभरा यांसह जवळपास 100 कोंबड्या आगीत जळून खाक झाल्या. सदर घटनेत विलास भातुसे यांच्या पायाला भाजले असता अधिक उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कारी (ता. सातारा) येथील विलास भातुसे यांच्या घराला अचानकपणे लागलेल्या आगीने मोठे आर्थिक नुकसान झाले. माळ्यावरील कडबा तसेच शेजारी गवताची गंज यामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आले. भातुसे यांनी घरालगतच कुकुटपालन केले असल्याने 100 हून अधिक कोंबड्या जळून खाक झाल्या. आगीचे लोट जस जसे वाढत होते. तसे ग्रामस्थ ही आग आटोक्यात आणण्यासाठी धडपड करत होते. अखेर फायरब्रिगेड गाडी बोलावून आग अटोक्यात आणली.
दरम्यान, विलास भातुसे यांना आग आटोक्यात आणताना त्यांच्या पायाला भाजले असता त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आगीचे कारण समजले नसून नुकसानीचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. मात्र, कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 8 ते 9 लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
डोळ्यासमोर घर पेटते पाहून अश्रू अनावर..
ज्या घरात राहून भविष्याची स्वप्न रंगवली जातात. मात्र, तेच घर डोळ्यासमोर आगीच्या भक्षस्थानी आलेले पाहून भातुसे कुटुंबीय गहिवरून गेले होते. संपूर्ण गाव आग आटोक्यात आणण्यासाठी झटत होता. मात्र, आगीचे लोट हे वाढतच होते.