“कराड शहरात दादागिरी, खंडणी, अवैध धंदे, कोयता गँग किंवा सामान्य नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. कायदा हातात घेणाऱ्यांवर यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल,” असा सज्जड इशारा कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिला आहे.
कराडात दहशत माजवून दोघांवर कोयत्याने वार करणाऱ्या सातजणांची सोमवारी सायंकाळी कराड शहर पोलिसांनी भर रस्त्यातून वरात काढली. या धडक कारवाईमुळे गुंडगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून शहरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
कराड शहरातील एसटी स्टँड परिसरात मागील चार दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून सातजणांनी दोघांवर कोयत्याने वार केले होते. त्यांना पोलिसांनी मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली होती. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी त्यांना बारा डबरी परिसर, विजय दिवस चौक ते एसटी स्टँण्ड परिसर वरात काढत गुंडगिरीची हवा टाईट केली. या कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. भर चौकात पोलिसांनी गुंडांना खाली बसविल्याने पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, कराड पोलिसांच्या या ‘ॲक्शन मोड’ची शहरभर जोरदार चर्चा सुरू असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यांमध्ये मात्र चांगलीच भीती निर्माण झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत होत असून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजश्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी या भाईगिरी करणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवून दिला. त्यामुळे कराडातील अगदी फाळकूट दादा ते रेकॉर्डवरील गुंडामध्ये जबरी वचक बसला आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे प्र्रमुखचे विजय गोडसे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, शादीवान मॅडम व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.