शिक्षणमहर्षी पद्मश्री डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन
News By : Muktagiri Web Team
कोल्हापूर: त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंत पाटील (वय 91) यांचे कोल्हापुरात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. शेतकरी कुटुंबातून आपला प्रवास सुरू करून राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला आहे.
कोरोना काळानंतर कोल्हापुरातील निवासस्थानी डॉ. डी. वाय. पाटील हे वास्तव्यास असत. मागच्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. घरातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. अगदी 20 दिवसांपूर्वीच त्यांना हृदयविकाराचा झटका देखील आला होता. मात्र त्यातून ते सावरत होते. अशातच 3 ऑगस्ट रोजी दिवसभरात त्यांची प्रकृती खालावत गेली आणि 4 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बुधवार, दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या 'यशवंत निवास' (कसबा बावडा, कोल्हापूर) येथे ठेवण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूरकरांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेता येईल.
22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप या छोट्याशा गावात डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म झाला होता. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, हा ध्यास त्यांनी आयुष्यभर जपला. 1983 मध्ये नवी मुंबईत 'रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'ची स्थापना केली. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे 3 हून अधिक डीम्ड विद्यापीठ आणि 180 पेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत आहेत, जिथे लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंत निवास येथून डॉ. पाटील यांची अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (लाईन बाजार, कसबा बावडा) च्या प्रांगणात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. संजय डी. वाय. पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील, मुलगी डॉ. नंदिता पालशेतकर आणि नातू ऋतुराज पाटील यांच्यासह मोठा परिवार आहे.


