कराड : कराड शहराजवळ पुणे-बंगळूर महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर स्कॉर्पिओ गाडी आणि ट्रक यांच्यात रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातातील सर्व युवक कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना कराड शहराजवळील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर हा भीषण अपघात झाला.
या अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे तेजस देशमुख (वय २५, चालक), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २०) आणि रोहित धोत्रे (वय २१) अशी आहेत. तर जखमींमध्ये ऋतुराज दुबळे (वय २१), शांतनू शिंगाडे (वय २०) आणि अमन तांबोळी (वय २३) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, कराड वाहतूक शाखेचे संदीप साळुंखे, संग्राम पाटील, दस्तगीर आगा, राहुल कदम, सचिन देवकर यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.