सातारा, दि. 19 :- जलसंधारणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने येत्या २१ ऑगस्ट रोजी भव्य वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले आहे. ही वॉकेथॉन सकाळी ठीक ६ वाजता राजवाडा येथून सुरू होणार असून शिवतीर्थ पोवई नाका येथे तिची सांगता होईल. वॉकेथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जलसाठ्यांचे जतन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले जाणार आहे. या वॉकेथॉनमध्ये शहर व जिल्ह्यातील नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
वॉकेथॉनच्या समाप्तीनंतर विशेष बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व सहभागी झालेल्या नामांकित स्पर्धकांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या या चळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.