पाटण, दि. ३० जुलै : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (दि. ३० जुलै) सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी एक फूट उघडून ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे.
सध्या कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट कार्यरत असून त्याद्वारे १,०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ६,१२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार असल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.
दरम्यान, पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सांडव्यावरील विसर्गात आणखी वाढ करण्यात येऊ शकते, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच नदीकाठावरील ग्रामप्रशासन व संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी केले आहे.