करहर -मुक्तागिरी वृत्तसेवा ; पाचगणी नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरमध्ये पर्यटक व व्यावसायिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नव्याने सुलभ शौचालय उभारण्यात येणार आहे. या शौचालयाचे भूमिपूजन नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शॉपिंग सेंटरमध्ये यापूर्वी असलेल्या शौचालयाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. त्यामुळे वारंवार ड्रेनेज चोकअपच्या समस्या निर्माण होत होत्या. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बसविण्यात आलेले ई-टॉयलेटही नादुरुस्त असल्याने पर्यटक, स्थानिक नागरिक तसेच शॉपिंग सेंटरमधील व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत व्यावसायिकांनी नगरपरिषदेकडे नव्या शौचालयाची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत नगरपरिषदेच्या माध्यमातून आता ‘पे अँड यूज’ तत्त्वावर सुलभ शौचालय उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे शौचालयाची नियमित स्वच्छता व देखभाल राखण्यास मदत होणार असून पर्यटकांना स्वच्छ आणि चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
या भूमिपूजनप्रसंगी उपनगराध्यक्षा माधुरी कासुर्डे, बांधकाम सभापती राजेंद्र पारठे, शेखर कासुर्डे, नारायण बिरामणे, महेश खांडके, आकाश बगाडे, अमित कांबळे, सुप्रिया माने, शिल्पा माने, विमल भिलारे, गणेश कासुर्डे, प्रवीण बोधे, मुख्याधिकारी पंडित पाटील, आर्किटेक्ट निखिल पवार आदी उपस्थित होते.