काही वर्षापूर्वी जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व अन्य काही भ्रष्टाचार निर्मुलन समित्या कार्यरत होत्या. मात्र अलिकडच्या काळात त्यांचे काम थंडावले असल्याची चर्चा आहे. तर एक-दोन संघटना सोडल्या तर आंदोलन हा विषय संपल्यात जमा असल्याचे चित्र आहे. तसेच निवडणूकी पुरते जागे होणारे विरोधी पक्षाचे नेते दैनंदिन विषयात चिडीचुप असल्याने भ्रष्ट अधिकार्यांना सगळीकडे रान मोकळे झाले आहे.
वडूज/प्रतिनिधी: भारत देश स्वतंत्र होण्यासाठी खटाव तालुक्यातील ९ हुतात्म्यांनी १९४२ साली बलीदान दिले होते. तर मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्यासाठी आत्तापर्यंत १० ते १२ जवान शहीद झाले आहेत. अश्या हुतात्मा भूमी असलेल्या खटाव तालुक्यात अलिकडच्या काळात भ्रष्टाचाराची किड चांगलीच वाढू लागली आहे. त्यामुळे हुतात्मा भूमी भ्रष्टाचारासाठी चराऊ कुराण होवू लागल्याची चर्चा जाणकारांमध्ये आहे.
दोन दिवसांपूर्वी जमिनीच्या दस्ताची दुरुस्ती करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना पुसेगावचा मंडलाधिकारी किशोर नंदू खटावकर यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.
मागील आठवड्यात सामाजिक वनिकरण विभागात बोगस कामे दाखवून कोट्यावधीचा निधी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित दोषी अधिकार्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यासंदर्भात न्यायालयाने निर्देष दिले आहेत. हे प्रकरण वडूज पोलीस कश्याप्रकारे हाताळणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुसर्या बाजूला महसूल विभागातील राजाचे कुर्ले येथिल गावकामगार तलाठी विलास पांडुरंग नागरगोजे यांच्यावर दोन महिन्यापूर्वी लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे.याशिवाय गेल्या दोन वर्षात आणखी एक मंडलाधिकारी, तहसिलदार कार्यालयातील एक-दोन लेखनिकावर लाचलुचपत विभागाने थेट कारवाई केली होती. यावेळी काही वरिष्ठ अधिकार्यांचीही नांवे चर्चेत होती. मात्र संबंधितांनी आपले कौशल्य वापरून अटकपूर्व जामीन घेवून आपल्यावरील कारवाई थोपवून धरल्याची चर्चा आहे. मागील काही वर्षापूर्वी तहसिलदार कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकार्यांनी पिक विमा योजनेमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला होता. हा विषय आजपर्यंत न्यायप्रविष्ठ आहे. अलिकडच्या काळात महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर दप्तर दिरंगाई व आर्थिक उलाढालीचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे.
वीज वितरण कंपनीतील काही प्रकरणावर वरिष्ठ पातळीवर सुनावणी सुरू असल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावरही काही ग्रामसेवकांपासून टेबल कारकून, वेगवेगळ्या विभागातील अभियंते तसेच वरिष्ठ अधिकारी मनसोक्त खाबुगिरी करत असल्याची चर्चा आहे. तर भूमि अभिलेख सारख्या खात्याच्या ‘मोजणी’ चा कोणालाच अंदाज येत नसल्याची चर्चा आहे. पोलीस ठाण्यात तर ‘देणे ईश्वराचे’ या न्यायानेच कारभार चालत असल्याचे समजते. हीच परस्थिती सार्वजनिक बांधकाम, दुय्यम निबंधक कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, व अन्य काही शासकीय कार्यालयात सुरु आहे.