कराड तालुक्यातील पोलीस निरीक्षकासह हवालदार लाचलुचपतच्या जाळ्यात
News By : Muktagiri Web Team
कराड : आकाशपाळणा लावण्यासाठी आवश्यक ना हरकत परवाना देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूळचे राहणारे कराड तालुक्यातील आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यासह पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. याप्रकरणी हवालदार दीपक पोळ याला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे हे मूळचे राहणारे कराड तालुक्यातील येवती गावचे असल्याने यांचे नाव या लाच प्रकरणात संशयित आरोपी म्हणून समोर आल्याने कराड तालुक्यातही या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचा आकाशपाळणा लावण्याचा व्यवसाय आहे. सातारा शहरातील आळुचा खड्डा परिसरात आकाशपाळणा लावण्यासाठी त्यांनी दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. अर्जाच्या पाठपुराव्यासाठी ते शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागात काम करणारे पोलीस हवालदार दीपक पोळ यांना भेटले.
यावेळी आकाशपाळणा लावण्यासाठी आवश्यक ना हरकत परवाना देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या नावाने ३० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारदाराने त्यावेळी ३० हजार रुपयांपैकी १५ हजार रुपये दिले. उर्वरित १५ हजार रुपये दोन दिवसांनी देण्याचे ठरले.
त्यानंतर पोलीस हवालदार दीपक पोळ यांनी तक्रारदाराकडे उर्वरित लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सातारा येथील जुना दवाखाना, राजवाडा परिसरात दीपक पोळ यांनी पंचांसमक्ष ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे आणि पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईचे पर्यवेक्षक पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांनी केले. सापळा पथकात पोलीस हवालदार निलेश राजपूरे, गणेश ताटे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे, स्नेहल गुरव व अजित कर्ण यांचा समावेश होता.


