बँक आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य द्या; सहकारमंत्र्यांकडे ठराव पाठविणार -
'वाई अर्बन'च्या वार्षिक सभेत निर्णय
News By : ATUL SAPKAL
बँक आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य द्या; सहकारमंत्र्यांकडे ठराव पाठविणार - 'वाई अर्बन'च्या वार्षिक सभेत निर्णय
मुक्तागिरी वृत्तसेवा
वाई : दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची 105 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येथील साठे मंगल कार्यालयात उत्साही व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला, तसेच जुन्या थकीत कर्जांच्या प्रकरणावरून महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.
बँकेच्या थकीत व अनियमित कर्जांबाबत मागील संचालक मंडळाविरोधात सहकार विभागाने चौकशी करून सहकार आयुक्तांकडे अहवाल दाखल केला आहे. याप्रकरणी जुन्या संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपिल दाखल केले आहे. यासंदर्भात निर्णय घेताना सहकारमंत्र्यांनी बँकेच्या आणि सभासदांच्या हिताला बाधा पोहोचू नये, याची दक्षता घ्यावी. कोणत्याही गैरव्यवहाराला किंवा दोषी संचालकांना पाठीशी न घालता बँकेच्या हिताचे रक्षण होईल अशा पध्दतीने कारवाई करावी, असा महत्त्वाचा ठराव बँकेचे माजी अध्यक्ष डाॅ. मधुसुदन मुजुमदार यांनी मांडला. या ठरावाला प्रदीप चोरगे, मिलिंद पाटणकर, डाॅ. प्रकाश पोरे, डाॅ. मकरंद पोरे यांच्यासह उपस्थित सर्व सभासदांनी एकमुखाने अनुमोदन दिले. हा ठराव आता पुढील कार्यवाहीसाठी सहकारमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
सभेत बँकेच्या प्रगतीची आकडेवारी मांडताना अध्यक्ष अनिल देव यांनी सांगितले की, बँकेने चालू आर्थिक वर्षात नक्त एनपीए शून्य टक्क्यांवर आणण्यात मोठे यश मिळवले असून वैधानिक लेखापरीक्षणात 'अ' वर्ग मिळवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बँकेला सतत नफा होत असल्याने संचित तोटा कमी होत असून, पुढील वर्षात तोटा पूर्णपणे भरून काढण्याचा संकल्प आहे. ३१ मार्च २०२६ अखेर १०८ कोटी रुपये जुनी एनपीए शिल्लक होती, त्यापैकी ऑगस्टअखेर सुमारे ५ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. चालू वर्षात अधिकाधिक वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सर्व सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बँकेचा व्यवसाय वेगाने वाढतो आहे.
माजी संचालक मिलिंद भंडारे, विनय पोरे यांच्यासह उपस्थित सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अध्यक्ष अनिल देव, संचालक विवेक पटवर्धन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी समर्पक उत्तरे दिली. जुन्या थकीत कर्जांच्या वसुलीतील अडचणी स्पष्ट करताना संचालक विवेक पटवर्धन म्हणाले की, जुन्या कर्ज खात्यांमध्ये मालमत्तांचे मूल्यांकन जादा दराने दिले गेले होते, मात्र सध्याच्या बाजारभावात त्या कमी किमतीत विकाव्या लागत आहेत किंवा अनेक मालमत्तांना खरेदीदारच मिळत नाहीत. अशा वेळी लिलाव न झालेल्या मालमत्ता बँकेच्या मालकीच्या करण्यासाठी ६ टक्के प्रमाणे लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असल्याने वसुलीमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. असे असले तरी, मागील संचालक मंडळाशी चर्चा करून वसुलीचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नवीन इमारतीबाबत बोलताना, बँक आहे त्याच स्वतःच्या जागेत भविष्यात आधुनिक इमारत बांधण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी २०२५-२६ चा आर्थिक अहवाल, लेखापरीक्षित आर्थिक पत्रके, दोष दुरुस्ती अहवाल, अंदाजपत्रक तसेच आगामी वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक नियुक्तीचे विषय सभेपुढे सादर केले, ज्यांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
सभेच्या प्रारंभी संचालक काशीनाथ शेलार यांनी दुखवट्याचा ठराव मांडला. उपसरव्यवस्थापक आनंद पटवर्धन यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सहाय्यक सरव्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक महेश राजेमहाडीक यांनी आभार मानले. सौ. मनीषा घैसास यांच्या संपूर्ण 'वंदे मातरम्' गीताने सभेची सांगता झाली. सभेस वाई आणि परिसरातील व्यावसायिक, नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


