तडवळे:येथील दिवंगत पोस्टमास्तर व सेवानिवृत्त माजी सैनिक लक्ष्मण शंकर खाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दि.२६ रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत नातेपुते येथिल टी. व्हि. स्टार कीर्तनकार ह. भ. प. सागर महाराज बोराटे यांचे कीर्तन होणार आहे.
दिवंगत नायब सुभेदार लक्ष्मण खाडे (तात्यांनी)१९६२ ते १९८६ अखेर २४ वर्षे भारतीय सैन्य दलात सेवा बजावली होती. सेवा काळात त्यांनी सन १९६५ व १९७१ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारने रक्षा मेडल, संग्राम मेडल, समर सेवा मेडल, पूर्व पश्चिम स्टार मेडल, नागा हिल्स मेडल अशा प्रकारची दहा मेडल देऊन सन्मान केला होता.
सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गावात पोस्ट मास्तर ची नोकरी करून प्रामाणिक सेवा दिली होती.
अशा कर्तुत्ववान माणसाचे स्मरण राहण्यासाठी सागर महाराजांचे कीर्तन परिसरातील भजनी मंडळाचे भजन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ व हितचिंतकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांचे सुपुत्र हवालदार शिवाजीराव खाडे यांनी केले आहे.