वाई शहरात नगरपरिषदेची 'अतिक्रमण हटाव' मोहीम
वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि विनापरवाना फ्लेक्स जप्त
News By : ATUL SAPKAL
वाई : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी वाई नगरपरिषदेच्या वतीने शुक्रवारी (दि. 11 सप्टेंबर) शहरात धडक 'अतिक्रमण हटाव' मोहीम राबवण्यात आली. मागील बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही कारवाई सुरू केली असून, या कारवाईमुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आणि अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाई शहरात मुख्य किसनवीर चौक, छ. शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर विनापरवाना फ्लेक्स व होर्डिंग्ज लावण्यात आले होते. तसेच रस्त्यांच्या कडेला असलेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. याबाबत नागरिकांमधून तक्रारी होत होत्या. या पार्श्वभूमीवर, नगरपरिषद प्रशासनाने यापूर्वीच नागरिकांना अनधिकृत अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कारवाईच्या दिवशी सकाळी अतिक्रमण विभागाच्या वतीने रिक्षावरील लाऊडस्पीकरवरून पुन्हा एकदा गाडे, दुकानांचे बोर्ड आणि फ्लेक्स काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाने प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली.
किसनवीर चौक, गणपती आळी, भाजी मंडई परिसर आणि मुख्य रस्त्यांवर ही धडक मोहीम राबवण्यात आली. रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या टपऱ्या आणि साहित्य प्रशासनाने जप्त केले, तसेच विनापरवाना फ्लेक्स काढून मार्ग मोकळे करण्यात आले.
शहराचे सौंदर्य राखण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याचा इशारा नगरपरिषदेने दिला आहे. कोणत्याही व्यावसायिकांनी किंवा नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृतपणे टपऱ्या टाकू नयेत अथवा विनापरवाना फ्लेक्स लावू नयेत, अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक व कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या या धडक कारवाईचे वाई शहरातील सुजाण नागरिकांमधून स्वागत होत आहे.
या मोहिमेमध्ये कार्यालय अधीक्षक नारायण गोसावी, पथक प्रमुख तथा स्थापत्य नगर अभियंता कोमल साबळे, प्रशांत गंजीवले, मनोज बारटक्के, सर्वेश खाडे, जयश्री भोईटे, नितीन जाधव यांच्यासह आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि वसुली विभागाचे कर्मचारी सक्रियपणे सहभागी झाले होते.


