कराड तालुक्यातील उंब्रज येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मित्रांमधील वादातून झालेल्या या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाले. संबंधितांनी चार ते पाच फायर केल्याची माहिती समोर येत असून, त्यापैकी एका गोळीने एक जण गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच पाटण विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुदाम पाचोरकर तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढविला असून, घटनेचा तपास सुरू केला आहे.
गोळीबारामागील नेमके कारण, सहभागी व्यक्तींची संख्या आणि हल्लेखोरांची ओळख याबाबत पोलीस अधिकृत माहिती गोळा करत असून, पुढील तपास सुरू आहे.