*वरुण राजाची हजेरी व प्रशासनाची तत्परता* प्रशासनाने पालखी तळालगतचा डोंगर उतार काढून पालखी तळ प्रशस्त केला मात्र सोहळा पालखी तळावर पोहोचण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण पालखी तळावर पाणी साचल्याने मोठी समस्या उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मोठ्या प्रमाणावर खडी मागवून पालखी तळावरील पाणी दूर करुन खड्डे बुजविल्याने साठलेले पाणी आणि चिखलाने निर्माण झालेली समस्या दूर करण्यात प्रशासन यशस्वी झाले आणि सोहळा यशस्वीरित्या पालखी तळावर विराजमान झाला समाज आरती नं
फलटण दि. १८ : संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी आज शनिवारी सायंकाळी ६ वाजता बरड, ता. फलटण येथील पालखी तळावर पोहोचला, त्यापूर्वी बरड शहराच्या प्रवेशद्वारी माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यावेळी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, सरपंच प्रकाश लंगुटे, उपसरपंच सौ. आडके, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कर्णे, पोलीस पाटील अश्विनी टेंबरे, पोलीस पाटील संघटनेचे फलटण तालुकाध्यक्ष अमोल आढाव व त्यांचे सहकारी संघटनेचे पदाधिकारी, विविध सामाजिक व सहकारी संस्था, सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत समाज आरती संपन्न झाल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा बरड येथील पालखी तळावर एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला, यानंतर बरड व पंचक्रोशीतील भाविकांनी माऊलींच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे स्वागत व वारकरी, भाविकांची तन, मन, धनाने सेवा करुन फलटणकरांनी तृप्त भावनेने माऊलींना आज शनिवारी सकाळी भावपुर्ण निरोप दिला. सकाळी सहा वाजता फलटण येथील प्रशस्त पालखीतळावरून (विमान तळ) येथील एक दिवसांचा मुक्काम आटोपून सोहळ्याने बरडकडे प्रस्थान केले. सोहळा विडणी येथे सकाळच्या न्याहरी साठी थांबला.त्यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन अभंग, सरपंच सागर अभंग, उपसरपंच मनिषा नाळे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विलास अभंग, ग्रामीणचे पोलिस निरिक्षक राजकुमार भुजबळ, पोलिस पाटील सौ. शीतल नेरकर, धनाजी नेरकर, ग्रामविकास अधिकारी अंकुश टेंबरे, मंडल अधिकारी कैलास जाधव, तलाठी दत्तात्रय धुमाळ आदी मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. विडणी येथे राजेंद्र पवार व अर्चना पवार आणि महेंद्र पवार व प्रिती पवार या दाम्पत्यांच्या हस्ते मानाची पूजा, आरती करुन माउलींना नैवेद्य दाखविण्यात आला. सुमारे तासभराचा विसावा घेऊन हा सोहळा दुपारच्या भोजनासाठी पिंप्रदकडे मार्गस्थ झाला. पिंप्रद येथे या सोहळ्याचे स्वागत सरपंच स्वाती घनवट, उपसरपंच सागर बोराटे, पोलिस पाटील सुनिल बोराटे यांच्यासह ग्रामस्थांनी केले. पिंप्रद येथे माऊलींच्या पादुकांना स्नान घालुन वारीतील सर्व दिंड्यांच्यावतीने माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. दुपारच्या भोजनानंतर मार्गस्थ झालेला हा सोहळा सायंकाळच्या विसाव्यासाठी वाजेगाव येथे विसावला याठिकाणी स्थानिक मान्यवरांसह ग्रामस्थांनी माऊली....माऊली च्या जयघोषात सोहळ्याचे स्वागत केले. सुमारे अर्ध्या तासाचा विसावा घेवून हा सोहळा बरड मुक्काम स्थळाकडे रवाना झाला.