कराडात अनैतिक संबंधातून महिलेचा खून
News By : Muktagiri Web Team
अनैतिक संबंधातून महिलेचा गळा दाबून तिला मारहाण करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिच्याच प्रियकराला कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुषमा तांबिरे रा. शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी सागर महादेव माने रा. जुने मालखेड ता. कराड असे ताब्यात घेतलेल्या प्रियकराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संबंधित मयत महिला ही कराड येथील शिवाजी स्टेडियम जवळ वास्तव्यास आहे. तिच्यात आणि सागर माने याच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वादावाद होत होता. गुरुवारी रात्री त्यांच्यात झालेल्या वादावादीत सागर माने याने तिला मारहाण करत जोर जोराने तिचा गाळा दाबला. त्यानंतर संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. तिला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याबाबतची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याला मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी घटनास्थळीभेट देत संबंधित संशयित आरोपी सागर माने याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शुक्रवारी महिलेवर उपचार सुरू असताना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यावरून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.


