चिमणगाव मुक्तागिरी वृत्तसेवा:सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कुमठे, ता. कोरेगाव येथे व्यापाऱ्याला मारहाण करून ४१ हजार रुपयांची रोकड जबरीने लुटणाऱ्या तिघा आरोपींना कोरेगाव पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण ४१ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले अशोक लेलंड 'दोस्त' कंपनीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे.
शुक्रवारी दि. ३१ जुलै रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मांडवे (ता. खटाव) येथील व्यापारी लंकेश निवृत्ती शिंगाडे हे त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये नायरा पेट्रोल पंपाजवळ थांबले असताना तिघा अज्ञातांनी त्यांना मारहाण करून ४१ हजार रुपयांची रोकड जबरीने हिसकावून नेली होती.
घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या अशोक लेलंड 'दोस्त' वाहनाचा माग काढत अल्पावधीत तिघांची ओळख पटवून त्यांना त्याच दिवशी अटक केली. आरोपींकडून लुटलेली संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली असून गुन्ह्यातील वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.
या जलद कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे, अमित गायकवाड, ओंकार भेगडे तसेच कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.