सातारा : सातारा पोलिसांनी वाई येथील जिल्हा परिषद सदस्य बंडू शिंदे यांच्या कथित अपहरण प्रकरणी खोटा गुन्हा दाखल करून जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांना अटक केली आहे.
जिल्हा परिषद सभागृहाबाहेरच पोलिसांनी ही कारवाई करत दोघांना धक्काबुक्की करत बाहेर नेल्याचे सांगण्यात येत आहे. अत्यंत बेजबाबदार पद्धतीने अटक करण्यात आली असून सभागृह परिसरातून जबरदस्तीने त्यांना बाहेर काढण्यात आले.
या कारवाईनंतर पोलिसांनी दोघांना थेट महाबळेश्वर पोलीस ठाण्यात नेले. अपहरणाच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, संबंधित बंडू शिंदे यांनी स्वतः वाई उपाधीक्षकांना माझे कोणतेही अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
असे असतानाही पोलिसांनी बळाचा वापर करत अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप दोघांनी केला आहे. या घटनेदरम्यान प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तातडीने क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात उपचार घेत असताना अनिल देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत संपूर्ण घटनेचा तपशील मांडला. दरम्यान, याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. एमएलसी रूममध्ये दोघांना तपासासाठी नेण्यात आले असून पत्रकारांना मात्र बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.