मुक्तागिरी वृत्तसेवा
कराड, दि. 11 ः कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याच्या संशयावरून रत्नागिरी गोडाऊनच्या मागील परिसरातुन चौघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.
यामध्ये मुजावर कॉलनीतील दोघे, काले ता. कराड येथील एक जण तर येडेमच्छिंद्र ता. वाळवा येथील एक जण असे चौघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करडातील रत्नागिरी गोडाऊन च्या पाठीमागे चौघेजण चार देशी बनावटीचे पिस्टल बाळगून संशयास्पद फिरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून चार देशी बनावटीचे पिस्टल व प्रत्येकी दोन जिवंत काडतूसे असा मुद्देमाल मिळून आला आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांकडून अवैध शस्त्र बाळगण्याबाबत तसेच त्याचा वापर आणि पुरवठा साखळी याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, या कारवाईबाबत कराड शहर पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे, जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची संख्या आणि कारवाईचे नेमके स्वरूप याबाबत अधिकृत खुलासा होणे बाकी आहे.
दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.