कृष्णा कारखान्याकडून ३९०० रुपये ऊसदर जाहीर
News By : Muktagiri Web Team
शिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यास सन २०२६-२७ या हंगामात गळीतास येणार्या ऊसाला प्रतिटन ३९०० रूपये दर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. दरम्यान, उर्वरित दर हा इतर कारखान्यांप्रमाणे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कृष्णा कारखान्याने यंदाही चांगला दर देण्याची परंपरा जपली आहे. तसेच केवळ दर देऊनच न थांबता अचूक वजन, उसाची वेळेत तोड आणि शेतकऱ्यांच्या हक्काची ऊस बिले वेळेत अदा करणे, या त्रिसूत्रीमुळे कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. सभासदांना मोफत घरपोच साखरेसोबतच कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध शेतकरी हिताचे व विकासात्मक उपक्रम सातत्याने राबवले जातात. कारखान्याची वाटचाल ही शेतकरी, सभासद, कामगार आणि परिसराच्या सर्वांगीण विकासाशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेला विश्वास, हीच सर्वात मोठी ताकद आहे. पारदर्शक कारभार आणि सभासदांच्या कष्टाचे योग्य मूल्य करण्याची भूमिका कारखान्याने यंदाच्या हंगामातही कायम राखली असून, कृष्णा कारखान्याने यंदाच्या हंगामासाठी ३९०० रूपये ऊस दर जाहीर केल्याने, शेतकरी सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


