कराड, दि. 3: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची निवड केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देत पाटील यांचे अभिनंदन केले.
पक्षीय कामकाजात केलेल्या सक्रिय योगदान, संघटन मजबूत करण्यातील भूमिका आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत पाटील यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात पक्षविस्ताराला नवीन उभारी देण्यासाठी आपण योग्य व्यक्ती आहात, असे नमूद करत प्रदेश नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
या नियुक्तीमुळे सातारा जिल्ह्यातील पक्षकार्याला नवी चालना मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला असून पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटन मजबुतीसाठी सकारात्मक बदल घडू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.