‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कुमठे : ‘कोरेगाव तालुक्यातील एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) या गावांची वाटचाल कोरोना हॉटस्पॉटकडे होती, मात्र आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था उपलब्ध करून देत चांगला निर्णय घेतला आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
आ. शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून एकंबे येथे 500, बिचुकले येथे शंभर आणि नलवडेवाडी (बिचुकले) येथील 50 कोरोनाबाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराची कीट, ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन मशीन व्यवस्था केली असून, या साहित्याचे वितरण गुरुवारी दुपारी पंचायत समितीमध्ये ना. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदे, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, रमेश उबाळे, डॉ. गणेश होळ, डॉ. नितीन सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, ‘राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध घातले असून, सर्वसामान्य जनता त्याचे पालन करत नाही, हे दुर्दैवी आहे. ग्रामीण भागात नियमांचे पालन होत नसल्याने एकंबे, बिचुकले आणि नलवडेवाडी (बिचुकले) येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.’
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘एकंबे गावाने कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू केल्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून अधिकाधिक तपासणी करण्याबाबत सूचना केल्या. स्वत: गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि शासनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले असून, तेथे चार बेड्सची व्यवस्था केली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यावर प्राथमिक उपचार तेथेच होतील, अशी व्यवस्था केली आहे. भविष्यकाळात आणखी गरज लागल्यास औषधोपचार कीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.’
कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेचे शहराध्यक्ष सनी शिर्के, अजित बर्गे, बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार, एकंबेचे माजी सरपंच हणमंत मदने, बाळासाहेब कदम, केतन चव्हाण, अतुल चव्हाण, विकास शिंदे उपस्थित होते.