कराड, -अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोटे, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
अनिकेत प्रकाश लोहार (वय २३, रा. कोळे, ता. कराड) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात कोळे येथील अनिकेत लोहार या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केले होते. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व तेथून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी शासकीय वाहनातून संबंधित आरोपीला परत उंब्रज पोलीस ठाण्यात नेत होते. त्यावेळी गोटे गावच्या हद्दीत पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला.
अपघातानंतर वाहनातील पोलीस कर्मचारी खाली उतरले. त्यावेळी संधीचा गैरफायदा घेत आरोपी अनिकेत लोहार याने हातातील बेड्यांसह वाहनातून खाली उडी घेत महामार्गाच्या पूर्वेकडे पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, उसाच्या शेतातून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जादा पोलीस त्याठिकाणी बोलविण्यात आले. पोलिसांनी परिसरात शोध घेतला. मात्र, आरोपी आढळून आला नाही. याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी रवींद्र चंद्रकांत चव्हाण यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक फौजदार जगदाळे तपास करीत आहेत.