सट्टा बाजारही ऑनलाईन कराड शहर व तालुक्यात आयपीएल सट्टा घेण्यासाठी सध्या दोन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. त्यामध्ये मोबाईल द्वारे आणि ऑनलाईन पद्धतीनेही सट्टा घेतला जात आहे. ऑनलाईन सट्टा घेताना आयडी देऊन खेळण्यात येतो. यामध्ये लाईव्ह गुरू ॲपसह अनेक ॲपचा उपयोग केला जातो. यामध्ये मॅचचा भाव दिसून येत असतो. त्यामध्ये पोलिसांना गुंगारा देण्यासाठी सांकेतिक कोडवर्ड ही वापरण्यात येत असतात.
आयपीएल 2025 च्या पहिल्या दिवशीचा टॉस कलकत्त्यात उडाला. याचवेळी कराडच्या सट्टेबाजारात कोटींचा फुलटॉस झाला. कराड शहर व तालुक्यात आयपीएलचा सट्टा घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच सुरूवात झाली होती. यामध्ये कराड शहरातील व तालुक्यातील अवैध व्यवसाय करणारे तर काहीजण राजकीय पदाधिकाऱ्यांनी षटकार मारल्याचे समोर आले आहे. तर अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे पोलीस क्लिन बोल्ड झाल्याची चर्चा कराडात होती.
शनिवार दि. 22 मार्चपासून टाटा आयपीएलचा सिझन सुरू होत आहे. त्यामुळे देशात उत्सहाचे वातावरण आहे. करोडो क्रिकेट शौकिनांना याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचबरोबर कराड शहर व तालुक्यातही हजारो क्रिकेट शौकिन आपल्या आवडत्या संघावर, क्रिक्रेटवर बोली लावण्यासाठी कराड शहरसह तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी फोनवरून किंवा प्रत्यक्ष हजर होते. कराड शहरात आयपीएलचा सट्टा घेण्याऱ्यांची संख्या तर भरपूर वाढली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांसह अवैध धंदे करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये मटका, ऑनलाईन लॉटरी सेंटर, चक्री यासारखे व्यवसाय करणारे तर खुलेआम सट्टाचा व्यवसाय करत आहेत. यासाठी त्यांनी खास आपल्या मजतील हॉटेलमध्ये रूमही बुक केल्या आहेत. त्याचबरेोबर माणसेही नेमली आहेत. हे सर्व सुरू असताना पोलिस प्रशासन मात्र गांधारींच्या भूमिकेत दिसत आहे. हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून सुरू असलेला हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. याला कारणेही त्याच प्रकारची आहेत.
आयपीएल सुरू होते तेव्हापासून या सट्टेबाजांचा धुमाकूळ सुरू होतो हे माहिती असूनही कराड शहर व तालुका पोलिस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. या सट्टेबाजांमध्ये आजी-माजी नगरसेवकांचे चेले-चपाटे, तर कोणी मटका बुकी करणारे तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तर कोणी शेठजी आघाडीवर आहेत. या सर्वांकडून पोलिसांना वेळेवर मालपाणी मिळत असल्याने या सट्टा बाजाराला कराड शहरासह परिसरात ऊत येणार आहे. जर पहिल्याच दिवशी लाखोची उलाढाल होत असेल तर हळूहळू याची रक्कम वाढत जाणार आहे. कराड शहर व परिसरात डीवाएसपी असतील किंवा शहर व तालुक्याचे निरीक्षक असतील यांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना वेळोवेळी ठेचून काढल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, या सट्टेबाजांनी आम्ही वरूनच सेटींग लावली असल्याची कुजबुज करीत आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस आमचे काही करू शकणार नाहीत अशा आर्विभावात आहेत.
पोलीस प्रशासनाला कराड शहर व परिसर जर शांत ठेवायचा असेल तर या अवैध व्यवसाय करणाऱ्यांना वेळीच ठेचून काढले पाहिजे. आयपील सीझनच्या पहिल्याच दिवशी अगदी टॉस टाकण्यापासून प्रत्येक खेळाडूवर बोली लावली जात आहे. यामध्ये एक हजारावर दहा हजार अशा प्रकारे प्रत्येक खेळाडू किंवा मॅच कोण जिंकणार, मॅन ऑफ द मॅच कोणार होणार इथपर्यंत सट्टा लावला जातो. या सट्टेबाजारांनी यासाठी टीव्ही स्क्रीन, लॅपटॉप, राऊटर, मोबाईल हॅण्डसेट सह नवीन सिमकार्डचेही खरेदी अगोदरच करून ठेवलेली आहे.
- सट्टा बाजाराचे खूप मोठे रॅकेट
- सट्टा बाजारात कराड शहरासह अनेक मोठे मोठ्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी मोठी टीम आहे. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून अधिकारी मॅनेज केले असल्याचा दावा यांचे चेलेचपाटे करत आहेत. त्यामुळे काही झाले तरी कराडातील आयपीएल सट्टा बाजार बंद होणार नसल्याचा कॉन्फिडन्स येथील सट्टा बाजारांना आला आहे.