मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 7 ः सोशल मीडियावर उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याविषयी अपशब्द वापरुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवसेनेच्या तालुका प्रमुखावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुलाबराव गणपतराव शिंदे-पाटील यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. काकासाहेब जाधव (रा. मुंढे, ता. कराड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्हॉटस्ॲपवर ‘शिवसेना एकनाथ शिंदे' नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये शिंदे गटातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचा तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव हाही त्या ग्रुपमध्ये आहे. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काकासाहेब जाधव याने संबंधित सोशल मीडिया ग्रुपवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना उद्देशून अपशब्द वापरले. अश्लिल भाषेत त्याने त्या ग्रुपवर शिविगाळ केली. संबंधित ग्रुपमध्ये असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना तसेच इतरांना लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वापरुन त्याने मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. काकासाहेब जाधव याने माहिती तंत्रज्ञान उपकरणाचा गैरवापर करुन मंत्री शंभूराज देसाई यांना अपशब्द वापरीत जनमानसात त्यांची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार गुलाबराव शिंदे यांनी रविवारी पहाटे कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी काकासाहेब जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी करीत आहेत.