कराड, दि. 26 ः कराड शहर व परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणूकद्वारे कोट्यावधी रूपयाला गंडा घालणाऱ्या तिघांना कराड शहर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड शहर व परिसरातील अनेक नागरिकांच्या शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणुक झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी कराड शहर पोलिस ठाण्याला दिल्या होत्या. डीवायएसपी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांचे पथक चार दिवसापासून मध्यप्रदेश, भोपाळ येथे तळ ठोकून होते. माळी यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून तपास सुरू होता. त्यांनी चार दिवस तेथे कसून तपास करून कराड शहर व परिसरातील नागरिकांना कोट्यावधी रूपयाला गंडा घालणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांना गुरूवारी कराड शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणूकीद्वारे गंडा घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस यामध्ये आणखी नवीन काही नावे निष्पन्न होत आहेत का याचाही तपास करत आहेत.