ऐतिहासिक फलटण नगरीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत
News By : युवराज पवार
तरडगाव येथील पालखी तळावरुन सकाळी ६ वाजता सोहळ्याच्या प्रस्थानानंतर सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवन व वडजल येथे विसावा घेवून व पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्विकार करुन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फलटण शहरात दाखल झाला. या सोहळ्याचे सुरवडी येथे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सरपंच शरयू जितेंद्र साळुंखे यांनी स्वागत केले. निंभोरे येथे सरपंच मोहिनी चिंचकर, उपसरपंच नवनाथ कांबळे, अमित रणवरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व देवस्थान व यात्रा कमिटीचे विश्वस्त व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. टाळ मृदुंगाच्या गजरात व हरी नामाच्या जयघोषात विठु दर्शनाची आस घेऊन पंढरपूराकडे निघालेल्या या सोहळ्याचे शहराच्या प्रवेशद्वारावर फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी निखिल जाधव व नगर परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी व अन्य माण्यवरांनी स्वागत केले. माऊलींचा हा सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर तो मलठण, सदगुरु हरीबुवा मंदिर, पाचबत्ती चौक या मार्गे ऐतिहासिक श्री राम मंदिराजवळ आला. यावेळी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट च्या वतीने माऊलींसह लाखो भाविकांच्या जनसमुदायाचे स्वागत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, यांच्यासह राजघराण्यातील अन्य मान्यवरांनी केले. त्यानंतर पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमान तळावर मुक्कामासाठी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विसावला. वारीत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांपासुन शहर व तालुक्यातील गावकऱ्यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. समाज आरती नंतर माऊलींच्या दर्शनासाठी फलटणरांनी मोठ्या रांगा लावल्या.
आज पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे फलटण शहरात सर्वत्र 'उत्सव आनंदाचा चैतन्याचा, स्फुर्तीचा, उत्सव माउलींच्या विठ्ठल भक्तीचा' असे वातावरण होते. पालखी सोहळ्याचे आगमन शहरात जरी संध्याकाळी झाले असले तरी वारकऱ्यांचे सकाळपासुनच शहरात मोठ्या प्रमाणात आगमन होत होते. सर्वत्र टाळ मृदुंगाचा गजर व हरी नामाचा जयघोष व भगव्या पताका या मुळे अवघे शहर विठ्ठलमय झाल्याचे दृष्य सर्वत्र दिसुन येत होते. शहरात दिवसभर विविध सहकारी व सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे व फलटणवासीयांकडून ठिकठिकानी मोफत पाणी, चहा, बिस्किटे, अल्पोपहार, फळेवाटप, जेवणाची सोय वारकऱ्यांसाठी करण्यात आली होती. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्नशील असल्याचे चित्र फलटण शहर व परिसरात सर्वत्र दिसून येत होते.
दरम्यान वारकऱ्यांना अडचणी येवु नयेत या करीता नीरा उजवा कालव्यात पाणी सोडण्यात आले होते त्या मुळे आंघोळ व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली. वारकऱ्यांसाठी पिण्यास पाणी टँकरद्वारे पुरविण्यात आले. पालखी तळावर तात्पुरत्या स्वरुपात शौचालये व स्वच्छता गृहे उभारण्यात आली होती. पुरवठा विभागाच्या वतीने पालखी तळावर गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य तपासणी व औषधांचे वाटप करण्यात येत होते. वीज वितरण कंपनीच्या वतीने वीज पुरवठा खंडित होणार नाही याची व्यवस्था केली होती. वारकर्यांच्या समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यासाठी पालखी तळावर नगरपालीकेच्या वतीने मदत केंद्र कक्ष उभारण्यात आला होता. वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग आरोग्य विभाग, सातारा जिल्हा प्रशासन यांच्या वतीने मोफत आरोग्य सेवा यासह मोफत मोबाईल चार्जिंग स्टेशन, ठिकठिकाणी आंघोळीची व पिण्याचे पाण्याची सोय सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. . फलटण शहरातील ऐतिहासिक राम मंदिर व जबरेश्वर मंदिर येथेही दर्शनासाठी वारकरी व महिलांनी रांगा मोठ्या लावल्या होत्या.
दरम्यान उद्या शनिवार दिनांक १८ जुलै रोजी फलटण येथून सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवुन हा सोहळा सातारा जिल्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी दाखल होणार आहे. रविवार दिनांक १९ जुलै रोजी हा वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन दुपारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.


