ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी फलटण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
फलटण : ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने विविध मागण्यांसाठी फलटण प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
धनगर समाजाला एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, त्यानंतर मेगा भरती त्वरित करावी या व इतर मागण्यांसाठी धनगर समाज आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑगस्टला जिल्ह्यातील विविध तहसील कार्यलयात निवेदन देण्यात आल्याची माहिती महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे यांनी दिली.
धनगर समाज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या स्वयंम योजनेबाबत सरकार गप्प का आहे, हे समजत नाही.म्हणूनच धनगर समाजातील विद्यार्थ्यांची जात पडताळणी प्रकरणे त्वरित निकालात काढावी, दुग्ध उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार्या मेंढीला राष्ट्रीय पशूचा दर्जा मिळावा. अहिल्यादेवी व यशवंतराव होळकर यांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा. मेंढपाळ बांधवांना वने आरक्षित करून त्यांना पास उपलब्ध करून द्यावे, अशा आशयाचे निवेदन शासनाला देण्याचा हा आमचा पहिला टप्पा आहे.
दरम्यान, धनगर समाजाचा घोंगडी बनवणे, हा मुख्य व्यवसाय आहे. तो आता अडचणीत आला आहे. त्यामुळे धनगर बांधवांसमोर संकट उभे राहिले आहे. यावेळी प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना निवेदन देताना धनगर महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष राजू लोखंडे, फलटण तालुकाध्यक्ष तानाजी कोलवडकर, फलटण युवक आघाडी अध्यक्ष बापू लोखंडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.