माण पंचायत समितीत राष्ट्रवादीचा झेंडा
विक्रम शिंगाडे सभापती, प्रियांका जगदाळे उपसभापती
News By : Muktagiri Web Team
सातारा जिल्ह्यातील माण पंचायत समितीच्या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असताना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारत सभापतीपदावर आपला झेंडा फडकावला. पंचायत समितीच्या सभापतीपदी वरकुटे–मलवडी गणाचे सदस्य विक्रम शिंगाडे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी मार्डी गणातील प्रियांका भुजंगराव जगदाळे यांची निवड झाली आहे.
माण पंचायत समितीच्या एकूण १० जागांपैकी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी ५ सदस्य विजयी झाल्याने सभापतीपदाची निवडणूक अत्यंत रंगतदार झाली होती. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे तर भाजपकडून अर्जुन चांगदेव काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र झालेल्या मतदानात विक्रम शिंगाडे यांनी विजय मिळवत सभापतीपद पटकावले.
उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका जगदाळे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत पळशी गणातील भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र खाडे यांचा पराभव झाला. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पकड मजबूत केली आहे. या निकालामुळे पंचायत राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
या विजयामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, कुकुडवाड गटाचे विजयी सदस्य अनिल देसाई, तसेच अभयसिंह जगताप, बबनदादा विरकर, मनोजकुमार पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि दिलीप तुपे आदी मान्यवरांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
माण पंचायत समितीच्या या निवडणुकीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून पुढील काळात स्थानिक राजकारणात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे


