कोल्हापूर (प्रतिनिधी) – आज दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वनक्षेत्र करवीरच्या पथकाने फुलेवाडी रिंग रोड येथील ‘फ्रेंडशिप फिश कंपनी’ येथे छापा टाकून अनुसूची-१ मधील संरक्षित ‘शॉर्टफिन डेव्हिल रे (Mobula kuhlii)’ या दुर्मिळ समुद्री जीवाचा मृत (पाकट) नमुना जप्त केला.
सदर मासा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत तो ताब्यात घेतला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये WL ०४/२०२६, दिनांक २५/०२/२०२६ असा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी म्हणून सुनिल विनोद सातपुते (रा. येडेमच्छींद्र, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत वनक्षेत्रपाल करवीर नंदकुमार नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर कोळी, वनरक्षक ओंकार भोसले, विकास घोलप, महादेव कुंभार, विदेश तांबारे तसेच कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व मानद वन्यजीव रक्षक रमण कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपवनसंरक्षक कोल्हापूर धैर्यशिल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.