कराड नगरपालिका परिसरात सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला. या छाप्यात एका अधिकाऱ्यांसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा माहिती नोंद करण्यात आली नसल्याने याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी सायंकाळी एका तक्रारदाराच्या माहितीवरून कराड नगरपालिका परिसरात छापा टाकला. यावेळी तक्रारदाराने तक्रारीत नमूद केलेल्या अधिकाऱ्यासह दोघांना पकडण्यात यश आल्याची चर्चा रात्री उशिरापर्यत सुरू होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. तसेच याप्रकरणी कराड शहर पोलीस कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यामुळे याबाबतचा अधिक तपशील रात्री उशिरापर्यंत उपलब्ध होऊ शकला नव्हता.