वाईत डोंबारी समाजाच्या १० वर्षांच्या बालिकेचा विनयभंग;
आरोपीला 'बीएनएस' अंतर्गत अटक
News By : Muktagiri Web Team
डीवायएसपी सुनील साळुंखे यांच्याकडे तपास
मुक्तागिरी वृत्तसेवा
वाई:
पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून खेळ करणाऱ्या डोंबारी समाजाच्या एका १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना वाई येथील प्रसिद्ध गणपती घाट परिसरामध्ये घडली आहे. दिनांक १ जून २०२६ च्या मध्यरात्रीच्या (२ जूनच्या पहाटे) सुमारास हा प्रकार घडला असून, पीडित मुलीच्या वडिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला रंगेहाथ पकडण्यात यश आले आहे. राहुल वसंत पवार (वय २२, रा. सिद्धनाथवाडी, वाई) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचा तपास थेट उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) सुनील साळुंखे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार हे मूळचे रापली वडगाव, ता. चांदवड (जि. नाशिक) येथील रहिवासी असून, ते आपल्या कुटुंबासह डोंबारीचे खेळ करून उदरनिर्वाह करतात. खेळाच्या निमित्ताने हे कुटुंब १ जून रोजी वाई शहरात आले होते. दिवसभरात दोन ते तीन ठिकाणी खेळाचे प्रयोग करून झाल्यानंतर, रात्री विश्रांतीसाठी हे कुटुंब आपल्या तीन मुलांसह गणपती घाटावरील मोकळ्या जागेत झोपले होते.
१ जूनच्या मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास सर्वजण गाढ झोपेत असताना, आरोपी राहुल पवार याने तेथे येऊन झोपलेल्या १० वर्षीय बालिकेचे पाय धरून तिला खाली ओढले आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या बालिकेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करून आपल्या आईला उठवले. मुलीचा आवाज ऐकून आई-वडील तात्काळ जागे झाले. आपल्याला पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने तेथून पळ काढला, मात्र बालिकेच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता पाठलाग केला आणि त्याला पकडून ठेवले. मध्यरात्री झालेल्या या गोंधळामुळे परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी गोळा झाले.
यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांना बोलावून घेतले. वाई पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात आरोपी राहुल पवार विरुद्ध नवीन कायद्यानुसार, म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १७३ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या संवेदनशील गुन्ह्याचा पुढील तपास डीवायएसपी सुनील साळुंखे स्वतः करत आहेत.


