ऑनलाईन शेअर फसवणूक करणाऱ्या तिघांकडून साडेसात लाखांची रक्कम हस्तगत
News By : Muktagiri Web Team
कराड ः कराड शहर व परिसरातील नागरिकांना शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणूकद्वारे कोट्यावधी रूपयाला गंडा घालणाऱ्या तिघांना शहर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथील सागर विभागातील दमोह येथून ताब्यात घेतले आहे. त्यांनी अन्य व्यक्तीकडे दिलेली साडेसात लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांची माहिती अशी ः कराड शहर व परिसरात गेल्या सहा महिन्यापासून शेअर मार्केट, ऑनलाईन फसवणुक झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. त्याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल झाल्या आहेत. त्या घटनांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी शहर पोलिस ठाण्याला दिल्या होत्या. पोलिस उपाधिक्षक राजश्री पाटील, शहर पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांच्या पथकाने भोपाळ, रायसेन, इंदौर, खंडवा, जबलपूर, बालाघाट, ग्वालेर, उज्जैन, भिंड आदी ठिकाणी तांत्रिक तपास करीत मध्यप्रदेश, भोपाळ येथे तळ ठोकून अरबाज आयूब खान (वय 26, रा. वार्ड 06, बजरिया चैनपुरा ता.जि. दमोह), आशुतोष श्री लक्ष्मीनारायण मिश्रा (वय 26, रा. अभिनव होम्म कलोनी ता.जि.दमोह), रोहित भगवानदास पटेल (वय 25, रा. राजलवारी थाना पथरिया जिल्हा दमोह) या संशय़ीतांना ताब्यात घेतले. सागर विभागातील दमोह येथे संबंधित संशय़ीत मिळुन आले. त्यांच्याकडे कसुन तपास सुरु असुन संबंधित संशयीतांना पुन्हा तपासासाठी मध्यप्रदेशमध्ये नेण्यात आले. त्यांनी ज्यांना रक्कम दिली होती त्या संशयीताकडुन साडेसात लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. यातील संशयीतांची साखळी मोठी असण्याची शक्यता पोलिसांना आली असल्याने त्यांनी तपासाची गती वाढवली आहे. यामध्ये आणखी काही संशयित असून त्यांचाही शोध सुरू आहे. अजुनही मोठी रक्कम हस्तगत करण्यासाठी त्यांचे पथक दिल्ली, भोपाळला रवाना होणार आहे.


