शेतकर्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
फलटण : शेतकर्यांच्या दुधाला आधारभूत भाव, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण व शेतीसाठी लागणारी बी-बियाणे, रासायनिक खते व औषधे यामधील भेसळ व किमतीवर नियंत्रण ठेवण्याबाबत संभाजी ब्रिगेड फलटण तालुक्याच्यावतीने तहसीलदार आर. सी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकर्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दूध दरवाढीचा ठोस निर्णय त्वरित घ्यावा. तसेच कोरोना महामारीच्या नावाखाली दुधाचे 35 वरील दर 15 ते 18 वर आलेले आहेत. आज दुग्धजन्य पदार्थ पूर्वीच्या दराने मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, दूध उत्पादकांना आपले दूध कवडीमोल दरामध्ये दूध संघ चालकांना घालावे लागत आहे. तसेच पशुखाद्यावरती शासनाचे कोणतेच नियंत्रण नासल्याने पशुखाद्याची निर्मिती करणारे दुधाचे दर कमी होऊन देखील पशुखाद्य चढ्या भावाने विकत आहेत. तसेच दुधाचा 1-2 रुपयाने भाव वाढला तर पशुखाद्याचे भरमसाठ भाव वाढवतात. यावर शासन पातळीवर निर्णय घेऊन सरकारने किमती नियंत्रित ठेवाव्यात.
रासायनिक खते, औषधे व बी-बियाणे यामधील भेसळ व भरमसाठ किमती यावर कृषी विभागाच्या माध्यमातून कारवाई करून भेसळखोर लोकांवर मोक्कांतर्गत शिक्षेचा कायदा करण्यात यावा. व शेतकर्यांना शासन स्तरावर भेसळ ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे.
तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया व संसर्गजन्य आजारावरील उपचारांच्या खर्चाची माहिती हॉस्पिटलमधील नोटीस बोर्डवरती लोकांना माहितीसाठी प्रसारित करण्यात यावी, अशा मागण्यांची दोन निवेदन देण्यात आली.
जर या मागण्यांवर सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेडच्यावतीने शेतकर्यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे, सातारा जिल्हा सरचिटणीस प्रदीप घाडगे, फलटण शहराध्यक्ष संग्राम साळुंखे, बजीरंग भगत, वैभव सस्ते, तुषार सस्ते, संतोष जाधव, अजित शिंदे, मनोज जगताप, गोट्या शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.