‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना व्हायरसशी लढत-लढत आपण जगायला शिका,’ असे प्रतिपादन विधान परीषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
फलटण : ‘कोरोनाची भीती सर्वांनाच लागलेली आहे. साथीच्या रोगांवर आपण जसे घरगुती उपाय किंवा दवाखान्यातून एखादे इंजेक्शन घेऊन त्यावर उपाय करतो, त्याचप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून, आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यामुळे कोरोनाबाबत असणारी मनातील भीती काढून, आपल्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना व्हायरसशी लढत-लढत आपण जगायला शिका,’ असे प्रतिपादन विधान परीषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा फलटण तालुक्यात तरडगाव येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती उपसभापती सुरेखा खरात, गटविकास अधिकारी डॉ. गावडे तसेच वसंतकाका, सरपंच, उपसरपंच, विविध गावचे पदाधिकारी उपस्थित होते.
साधा सर्दी, खोकला, ताप असला तरीसुद्धा कोरोनाची टेस्ट करून, आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, सर्वांची काळजी घ्यावी, आपली आपण काळजी घेतली तरच आपण कोरोनामुक्तीच्या वाटेकडे जाऊ. यासाठी आपल्या गावात प्रशासनाच्या समितीबरोबर ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन माहिती जमा करून, प्रशासनाला व मला पाठवावी. लोकसहभागाशिवाय हे अभियान पूर्णत्वास जाणार नाही, असे सांगतानाच, लोकसहभागाचा कॉलम सर्वेक्षणामध्ये नसेल तर त्याचा एक सेपरेट कॉलम तयार करून लोकसहभागात समाविष्ट करण्यात यावा, अशा सूचना रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गटविकास अधिकारी गावडे यांना दिल्या.
कार्यक्रमाचे डॉ. कदम यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य संतोष कुंभार यांनी आभार मानले.