कऱ्हाडकरांसाठी ‘द्विचित्र’ प्रदर्शनासह कलामहोत्सवाची रंगतदार मेजवानी
अभिरुची फिल्म क्लबचा अनोखा उपक्रम; नामवंत कलाकार, चित्रकारांचा सहभाग
News By : Muktagiri Web Team
कऱ्हाड, : कऱ्हाडकर रसिकांसाठी एक खास सांस्कृतिक मेजवानी घेऊन ‘अभिरुची’ फिल्म क्लब पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. ना. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या काही वर्षांत कऱ्हाडसारख्या शहरात दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा निर्माण केली आहे.
याच परंपरेतून यंदा २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ या कालावधीत भव्य कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्याचबरोबर ‘द्विचित्र’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचीही मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ लेखक व चित्रकार विद्याधर म्हैसकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शहरातील कलाकार, कलाशिक्षक आणि चित्रकलेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, हे प्रदर्शन तिन्ही दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.
विशेष म्हणजे, समकालीन कलेतील महत्त्वाचे नाव असलेले चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी स्वतः रविवारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या कलाकृतींनी गेल्या काही दशकांत मराठी साहित्यक्षेत्र आणि दृश्यकलेवर ठसा उमटवला आहे. २०२२ साली त्यांना प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री सत्यजित रे पुरस्कार’ मिळाला असून, चित्रकला, ग्राफिक आर्ट, जाहिरात, व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांचा मुक्त वावर आहे.
रविवार, १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांची विशेष मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत लेखिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर तसेच कृष्णा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य अर्पिता पवार घेणार आहेत. हा कार्यक्रमही सर्वांसाठी विनामूल्य व खुला असणार आहे.
सर्व कार्यक्रम कऱ्हाडमधील वेणूताई चव्हाण सभागृह येथे पार पडणार आहेत.
‘अभिरुची’ फिल्म क्लबने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शन, व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या कलाकृती, तसेच नामवंत कलाकारांचे कार्यक्रम यशस्वीरीत्या आयोजित करून कऱ्हाडच्या सांस्कृतिक विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाचा हा महोत्सवही त्याच परंपरेला साजेसा ठरणार असल्याचे संकेत आहेत.
कऱ्हाडकर रसिकांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या दुर्मीळ संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महोत्सव संयोजन समितीने केले आहे.


