चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून युवकाचा खून
News By : Muktagiri Web Team

कराड, ः चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून कासेगाव ता.वाळवा येथील युवकास सात जणांनी अपहरण करून लोखंडी पाईप, दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत काही काही तासात सात संशयीतांना अटक केले असल्याची माहिती कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रहिमतुल्ला सलिम आतार (वय 27) असे मयत युवकाचे नाव असून मयत रहिमतुल्लाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून राकेश रामदास पाटील (वय 26), सुदाम मोहन पवार (वय 27), अमर सुरेश खोत (वय 27), विराज युवराज तोडकर (वय 26), उमेश रविंद्र पाटील (वय 28), विशाल हणमंत शिद (वय 23) व ऋषिकेश धनाजी तोडकर (वय 26) सर्व रा. कासेगाव ता.वाळवा अशी खुन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
पोलिस निरीक्षक जगताप पुढे म्हणाले, राकेश पाटील याची चुलत बहिण कराड तालुक्यात शिक्षण घेत आहे. रहिमतुल्ला आतार याचे बहिणीशी प्रेमसंमंध असल्याचा संशय राकेश यास होता. रहिमतुल्ला हा मोबाईल दुरूस्तीचा व्यवसाय करीत असल्याने त्याचे कराडला नेहमी येणे-जाणे होते. सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वरील सात संशयीतांनी दोन चारचाकी वाहनांतून येत वाठार ता. कराड येथुन रहिमतुल्लाचे अपहरण केले, व त्यास रेठरे व कासेगाव येथे विविध ठिकाणी नेऊन दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोखंडी रॉड, लाकडी दांडके व पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली. यानंतर जखमी अवस्थेत रहिमतुल्लाला संशयीतांनी त्याच्या घरी सोडले.
गंभीर जखमी असलेल्या रहिमतुल्लाला त्याच्या नातेवाईक उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार, पो.उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील यांनी कृष्णा हॉस्पिटल येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रेठरे, वाठार व कासेगाव येथे शोध मोहिम राबवत वरील सात संशयीतांना ताब्यात घेतले. अधिक तपास सखाराम बिराजदार करीत आहेत.
सदरची कारवाई अपर पोलीस अधिक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, इस्लामपूरचे डीवायएसपी मंगेश चव्हाण, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, कासेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णत कांबळे, कराड तालुका व कासेगाव पोलिसांनी केली.