बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या 22 किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली.
म्हसवड : बुधवारी सायंकाळी तब्बल अर्धा तास झालेल्या गारपिटीने आटपाडी शहराचा भाग असलेल्या 22 किमी वरील शेंडगेवाडीत झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर-आटपाडी मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आनंदरावबापू पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक, तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष जालिंदर कटरे, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सावंत, तालुका सरचिटणीस विजय पुजारी यांनी गारपीटग्रस्त शेत शिवारात फिरून पाहणी केली.
शेंडगेवाडीत झालेल्या गारपीट नुकसानीचे पंचनामे केले गेले असून, एकूण 62 शेतकर्यांचे ऊस, डाळिंब, मका व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात 17 हेक्टर बाधित क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल केला असल्याचे सांगण्यात आले. आटपाडीचे तलाठी सुधाकर केंगार, आटपाडीचे कृषी सहायक आनंद चव्हाण, आटपाडीचे ग्रामविकास अधिकारी यांच्या पाहणी पथकाने गारपिटीची पाहणी करून पंचनामे केले आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांचे गारपिटीने झालेल्या नुकसानीकडे आपण लक्ष वेधणार असून, शासनाकडून जास्तीत जास्त मदत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मिळावी, यासाठी त्यांना साकडे घालणार असल्याचे सुशांत देवकर, आनंदराव पाटील, सादिक खाटीक आदी पदाधिकार्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, अत्यंत धोकादायक बनलेला बनपुरी-शेंडगेवाडी हा 6 किमीचा रस्ता तातडीने खडीकरण, डांबरीकरणयुक्त करून दिला जावा, यासाठीही ना. पाटील यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे या पदाधिकार्यांनी सांगितले.
या गारपिटीने परिसरातील झाडे, पक्षी, कोंबड्या यांचे नुकसान झाले आहे. एक बोकड ही गारपिटीने दगावल्याचे पाहणीवेळी सांगण्यात आले.
यावेळी अनिल बाबर, विनायकराव शेंडगे, समाधान पुकळे, दत्ता पुकळे, समाधान मस्के, दाजी शिंदे आदी उपस्थित होते.