मेडिकल, दवाखाने वगळता सर्व व्यवहार राहणार बंद
कराड, दि. 24 ः कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली आहे.
या कालावधीत दवाखाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. दूध डेअरी सकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत व संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत चालू राहतील. तसेच किराणा दुकान, चिकन-मटण दुकान, भाजी विक्रेते, पतसंस्था, कृषी दुकाने, वि.का.स. सेवा सोसायटीचे व्यवहार पूर्णतः 8 दिवस बंद राहतील. कासारशिरंबेत सध्या 40 च्यावर कोरोनाचे सक्रीय रुग्ण असल्याने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची ही तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच राहून प्रशासनाने घालून दिलेल्या अटी शर्थीचे पालन करावे. तसेच रस्त्यावर विनाकारण फिरताना सापडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच विना मास्क फिरणार्यांना 500 रूपये दंड आकारण्यात येणार असल्याचे कासारशिरंबे ग्रामपंचायतीमार्फत सांगण्यात आले आहे.