शिवसेना सातारा उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन
News By : Muktagiri Web Team
कराड : शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख आणि कराडचे माजी नगरसेवक रामभाऊ रैनाक यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निधना समयी ते ६२ वर्षे वयाचे होते.१९८८ साली कराड सारख्या संवेदनशील शहरामधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रामभाऊ यांच्यावर शिवसेना कराड शहर प्रमुख पदाची जबाबदारी पडली. त्यांनी ती अत्यंत कौशल्याने पार पाडली. संघटन कौशल्य, उपक्रमशीलता व मनमिळावू स्वभावाच्या रामभाऊ रैनाक यांनी कराड शहर तसेच तालुक्यामध्ये शिवसेनेचा प्रसार आणि आणि प्रचार सुरू केला. संपूर्ण तालुक्यांमध्ये शिवसेनेचा विचार रुजवण्यामध्ये आणि वाढविण्यामध्ये रामभाऊ रैनाक यांचा मोलाचा वाटा होता. शिवसैनिक तशी भावना व्यक्त करत असतात. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कराड तालुक्या मध्ये शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातारा उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा जबाबदारी पडली होती.त्यासह एस.टी कामगार सेनेच्या कार्यात देखील त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता. कराड तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या रामभाऊ रैनाक यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कराड तालुक्यातील शिवसैनिकांवर एकापाठोपाठ एक असे दुःखाचे प्रसंग सुरू आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अशोक भावके,माजी शहर प्रमुख राजेंद्र जाधव,उपतालुका प्रमुख भिमराव कळंत्रे, कराड उपशहरप्रमुख कुलदीप जाधव अशा पदाधिकारी शिवसैनिकांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणाऱ्या शिवसेनेवर रामभाऊ यांच्या अकाली निधनाने पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.