टोळक्याकडून युवकाच्या मानेवर कोयत्याने वार
News By : Muktagiri Web Team
सातारा : सातारा शहरातील शेटे चौक येथे वर्दळीने गजबजलेल्या रस्त्यावर चार ते पाच युवकांनी एका युवकाचा थरारक पाठलाग करून त्याच्या मानेवर कोयत्याने वार केले. हा युवक रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडला होता. ही खळबळजनक घटना बुधवार दि. ५ रात्री सव्वाआठच्या सुमारास घडली. जखमी तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्याचे कारण नेमके समजू शकले नाही. याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील शेटे चौकामध्ये रात्री नेहमीप्रमाणे रस्त्यावर वर्दळ होती. याचवेळी एक युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरून धावत होता. त्याचा चार ते पाच युवक थरारक पाठलाग करत होते. त्यातील एका युवकाच्या हातात कोयता होता. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण तयार झाले. संबंधित तरुणाच्या हातात कोयता पाहून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला घाबरून बाजूला झाल्या. जखमी तरुणाच्या मानेवर कोयत्याचा वार करताच काही नागरिकांनी तातडीने धाव घेऊन संबंधित तरुणाची त्यांच्या तावडीतून सुटका केली. हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी या टोळक्यातील एक तरुण पोलिसांच्या हाती लागला. मात्र, इतर युवक घटनास्थळावरून पसार झाले. जखमी तरुणाला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही मुले अल्पवयीन असल्याचे बोलले जात आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.