मुंढे गावच्या हद्दीत गुटखा न दिल्याच्या कारणावरून एकाने डोक्यात दगड घालून एका 14 वर्षीय बालकाचा निर्गुण खून केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. कराडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विजयनगर, मुंढे या परिसरात 24 तासात दोन खुणाच्या घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील कमानी समोर रविवारी दुपारी दोघामध्ये गुटखा न दिल्याच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समजली आहे. त्या रागाच्या भरात एकाने दगड मारला आणि तो दगड समोरच्याच्या डोक्यात लागला. डोक्यात दगड लागल्याने त्याला गंभीर इजा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजली आहे. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.