कापूसखेड (ता. वाळवा) येथील उसाच्या शेतात वयोवृद्ध बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू वयोमानामुळे नैसर्गिक कारणाने झाल्याचे स्पष्ट झाले.
गावाच्या पश्चिमेकडील ओढ्यालगत शेतकरी संभाजी तुकाराम पाटील यांची शेती आहे. त्यांच्या उसाच्या शेतातून गेल्या चार-पाच दिवसांपासून तीव्र दुर्गंधी येत असल्याने शेतक-यांनी उसामध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती तत्काळ पोलीस पाटील प्रदीप बल्लाळ आणि वन विभागाला देण्यात आली.
सांगलीचे उपवनसंरक्षक सागर गौते, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे आणि शिराळा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर वन विभागाचे वनपाल दादासाहेब बर्गे, वनरक्षक अमोल साठे, बावचीचे वनरक्षक भीवा कोळेकर, हणमंत पाटील तसेच वनमजूर व रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील व सौ. पाठक यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. तपासणीत संबंधित बिबट्या अंदाजे १२ ते १३ वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले. वयोमानामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती वनरक्षक अमोल साठे यांनी दिली.
शवविच्छेदनानंतर वन विभागाच्या उपस्थितीत नियमानुसार बिबट्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.